शरीरसुखासाठी तरुणीला ब्लॅकमेल; तरुणावर गुन्हा
शरीरसुखासाठी तरुणीला ब्लॅकमेल; तरुणावर गुन्हा
प्रतिनिधी | जळगाव
सोशल मीडियावरून फोटो मिळवून ते व्हायरल करण्याची तसेच आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत महाविद्यालयीन तरुणीला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आसोदा येथील एका तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ एप्रिल २०२५ पासून सुरू होता. जळगाव येथे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणीशी नीलेश हिरामण मराठे (रा. आसोदा) याने वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने वारंवार मोबाइल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याने सोशल मीडियावरून तरुणीचे फोटो मिळवून, ती त्याच्याशी बोलत असल्याच्या रेकॉर्डिंगसह हे फोटो आई-वडील व इतर नातेवाईकांना सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली.
भीतीपोटी दिले एक लाखांहून अधिक रुपये
या धमक्यांमुळे तरुणी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. आरोपीने शरीरसुखाची मागणी करत तरुणीला ब्लॅकमेल केले. बदनामीच्या भीतीपोटी गेल्या वर्षभरात तरुणीकडून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात उकळल्याचा आरोप आहे. इतके पैसे घेतल्यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने पुन्हा संपर्क साधून आणखी २५ हजार रुपयांची मागणी करत मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले.
अखेर पोलिसांत धाव
सततचा जाच आणि मानसिक त्रास असह्य झाल्याने अखेर १९ मे रोजी रात्री तरुणीने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत आपबीती सांगितली. तिच्या फिर्यादीवरून नीलेश हिरामण मराठे याच्याविरुद्ध विनयभंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत