उरण नगरपरिषदेच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेचे १० वे यश; श्रीकांत सांगोलकर यांची नवी मुंबई पोलीस दलात निवड
उरण नगरपरिषदेच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेचे १० वे यश; श्रीकांत सांगोलकर यांची नवी मुंबई पोलीस दलात निवड
उरण : सुनिल ठाकूर-
उरण नगरपरिषद संचलित ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ येथील अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या कु. श्रीकांत सांगोलकर यांची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या यशाबद्दल नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांच्या हस्ते श्रीकांतचा सत्कार करण्यात आला.
सदर अभ्यासिका तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत श्रीकांतने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासिकेतील विद्यार्थ्याने मिळविलेले हे दहावे यश ठरले आहे. यापूर्वीही या अभ्यासिकेतील ९ विद्यार्थी एमपीएससी, पोलीस, तलाठी, मुंबई महापालिका तसेच विविध खाजगी कंपन्यांमध्ये निवड होऊन यशस्वी झाले आहेत.
श्रीकांतच्या निवडीमुळे अभ्यासिकेत शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोगत व्यक्त करताना श्रीकांत सांगोलकर यांनी सांगितले की, “उरणमधील ही एकमेव अभ्यासिका असून येथे वेळेचे बंधन नसल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची उत्तम सुविधा उपलब्ध होत आहे.” तसेच ग्रंथपाल संतोष पवार व सहाय्यक जयेश वत्सराज यांचे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी ॲड. निरंतर सावंत यांनी श्रीकांतला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जयेश वत्सराज यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीकांतने हे यश मिळविल्याचे सांगितले. ग्रंथपाल संतोष पवार यांनी श्रीकांतची जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीशी झुंज देण्याची वृत्ती यामुळेच हे यश शक्य झाल्याचे नमूद केले. तसेच वाचनालयाच्या वतीने श्रीकांत आणि त्याच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.
नगराध्यक्षा सौ. भावना घाणेकर यांनी श्रीकांतचे अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभ्यासिकेस मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच नगरपरिषदेमार्फत इन्व्हर्टर व इतर आवश्यक सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत