आर. के. पाटील यांच्या 37 वर्षांच्या सेवेला सलाम; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
आर. के. पाटील यांच्या 37 वर्षांच्या सेवेला सलाम; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापत्य शाखेतील लिपिक तथा महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र राज्यचे राज्य उपाध्यक्ष आर. के. पाटील यांच्या 37 वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनिमित्त आयोजित सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा दि. 26 जून 2026 रोजी संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आर. के. पाटील यांच्या 37 वर्षांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करताना, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील अग्रगण्य महामंडळ असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, "एसटी ही महाराष्ट्राची केवळ जीवनवाहिनी नसून रक्तवाहिनी आहे. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यामागे एसटी कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीत एसटी महामंडळ आणि त्यातील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे."
तसेच, आर. के. पाटील यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांनी विशेष गौरवोद्गार काढले.
यावेळी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आर. के. पाटील व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, चोपडाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जळगावच्या महापौर दीपमाला काळे, पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, माजी उपमहाव्यवस्थापक सोपानराव नाबदे, माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरण बिडवे, संघटक सचिव सुभाष जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख, सुरेश चांगरे, गोपाल पाटील, विनोद शितोळे, प्रशांत मोरे, सागर निकुंभ, खुशाल मोरे, शैलेश नन्नवरे तसेच जळगाव विभागातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते.
आर. के. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित राहिल्याने सभागृह गजबजून गेले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसटी महामंडळातील सर्व युनियनचे पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. बी. महाजन यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत