Contact Banner

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात; राजकीय चर्चांना उधाण

 

cm-devendra-fadnavis-uddhav-thackeray-travel-together-on-same-flight-to-nagpur

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात; राजकीय चर्चांना उधाण

लेवजगत न्यूज मुंबई : राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईहून नागपूरकडे एकाच विमानाने प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.






समोर आलेल्या माहितीनुसार, विमानतळावर आणि विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांची विचारपूस करत हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवादही झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि अनिल देसाई हेही उपस्थित होते.

उद्धव ठाकरे हे शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यासाठी यवतमाळ आणि वाशिमकडे रवाना झाले आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपूरला जात असल्याने दोघांचा एकाच विमानातून प्रवास झाला.

दरम्यान, या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "इंधन बचतीच्या दृष्टीने काही नेते खासगी विमानाऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करत असतील, तर त्यातून वेगळे राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. यामागे राष्ट्रहिताचा विचार असू शकतो."

तर मंत्री शंभूराज देसाई यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक लोक सार्वजनिक विमानसेवेचा वापर करत आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचा दौरा एकाच दिवशी असल्याने त्यांनी योगायोगाने एकाच विमानाने प्रवास केला असावा.

या एकत्रित विमानप्रवासामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे तर्क-वितर्क जोडले जात असले, तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून हा केवळ योगायोग असल्याचेच सांगितले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.