गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर बोचरा हल्ला; 'अरे राजा, आधी स्वतःचा आवाज सुधार', उबाठाच्या १४ आमदार फुटणार असल्याचा दावा
गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर बोचरा हल्ला; 'अरे राजा, आधी स्वतःचा आवाज सुधार', उबाठाच्या १४ आमदार फुटणार असल्याचा दावा
लेवाजगत न्यूज | जळगाव
राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार टीका केली आहे. 'ऑपरेशन टायगर २.०' नंतर आता 'ऑपरेशन टायगर ३.०' सुरू होणार असून, उबाठा गटातील १४ हून अधिक आमदार शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, "खासदारांचे जाणे ही फक्त सुरुवात होती, आता मुख्य पिक्चर बाकी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त दाढीवर हात फिरवला तरी 'ऑपरेशन टायगर ३.०' यशस्वी होईल."
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका करत, "अरे राजा, आधी स्वतःचा आवाज तर सुधार. वाघासारखं बोलायला गुलाबराव पाटलांसारखा पहाडी आवाज लागतो," असा टोला लगावला.
तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांवर भाष्य करत ते म्हणाले, "राजकारणात दौरे आवश्यक असतात; पण मुलाला जमत नाही म्हणून आता बापाने बाहेर पडण्याची वेळ आली आहे."
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर टीका करत, "आधीच महाराष्ट्र पिंजून काढला असता तर पक्षावर ही वेळ आली नसती. आता फिरून काहीही साध्य होणार नाही," असे म्हटले.
टीप: उबाठा गटातील १४ आमदार फुटणार असल्याचा दावा हा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेला राजकीय दावा असून, त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत