नंदुरबारमध्ये केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक; स्वतंत्र केळी विकास मंडळाच्या मागणीला गती
नंदुरबारमध्ये केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक; स्वतंत्र केळी विकास मंडळाच्या मागणीला गती
लेवाजगत न्यूज | नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी स्वतंत्र 'केळी विकास मंडळ' स्थापन करणे, केळीचे दर नंदुरबारमध्येच निश्चित करण्याची व्यवस्था निर्माण करणे तसेच पपई पिकालाही मनरेगा अंतर्गत अनुदानाचा लाभ देण्याची मागणी केली.
बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने केळी व पपई उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी प्रतिनिधींनी वाढते उत्पादन खर्च, मजुरी, सिंचन, खते, कीटकनाशके, वाहतूक खर्च तसेच हवामानातील बदलामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती देत केळीच्या दरनिर्धारणासाठी बाह्य बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची व्यथा मांडली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विषय केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, रक्षाताई खडसे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा येथे केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होणार असून संबंधित सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या सूचना व समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत