Contact Banner

पाच सेकंदांत उद्ध्वस्त झाले तीन जीव; धुळ्यात भीषण अपघात भरधाव लक्झरीची दुचाकीला जोरदार धडक; चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

dhule-fatal-luxury-bus-accident-varkhede-three-killed-parola-road

dhule-fatal-luxury-bus-accident-varkhede-three-killed-parola-road


धुळ्यात भीषण अपघात; वरखेडेतील तिघांचा जागीच मृत्यू

भरधाव लक्झरीची दुचाकीला जोरदार धडक; चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

धुळे, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : शहरातील पारोळा रोडवरील शेतकरी शिल्प परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात वरखेडे येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, वरखेडे येथील सुभाष लखन धनगर (४२), नीलेश संभाजी पाटील (३९) आणि सिंधुबाई शांताराम पाटील (८३) हे पहाटेच्या सुमारास दुचाकीने प्रवास करत होते. सुभाष धनगर हे दुचाकी चालवत होते, तर मागील आसनावर नीलेश पाटील व सिंधुबाई पाटील बसल्या होत्या. पारोळा रोडवरील शेतकरी शिल्पाजवळ दुचाकी पोहोचताच पाचोरा दिशेने वेगात येणाऱ्या लक्झरी बसने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की तिघेही काही फूट अंतरापर्यंत फरफटत गेले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सोबत प्रवास करणाऱ्या नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतर बस थांबविण्यात आली.

या प्रकरणी सिंधुबाई पाटील यांचे पुत्र रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी चालक अशोक भीला पाटील (रा. सावरखेडा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरतला जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा

रघुनाथ पाटील हे सुरत येथे नोकरी करतात. घरगुती कामानिमित्त गावी आल्यानंतर परत जाताना आई सिंधुबाई यांनाही सोबत घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पहाटे बसस्थानकाकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. नीलेश पाटील यांनीही रात्री आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसोबत वेळ घालवला होता. मात्र ती भेट अखेरची ठरली.

गावावर शोककळा

अपघाताची माहिती मिळताच वरखेडे गावात शोककळा पसरली. दुपारी तिन्ही मृतांच्या पार्थिवांवर पांझरा नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. फुटेजनुसार, पहिली दुचाकी रस्ता ओलांडल्यानंतर काही सेकंदांतच दुसऱ्या दुचाकीला भरधाव लक्झरीने धडक दिल्याचे दिसून येत आहे.

गतिरोधक व प्रकाश व्यवस्थेचा अभाव चर्चेत

अपघातानंतर परिसरातील रस्त्यांची स्थिती, बंद पथदिवे आणि डांबरीकरणामुळे नष्ट झालेले गतिरोधक याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत चर्चा सुरू झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.