Contact Banner

तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू मित्रासोबत पोहण्यासाठी गेला;

 



tapi-river-drowning-bhusawal-16-year-old-student-pratik-mahajan-dies


tapi-river-drowning-bhusawal-16-year-old-student-pratik-mahajan-dies


तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मित्रासोबत पोहण्यासाठी गेला; अकरावीत प्रवेशाचे स्वप्न कायमचे अधुरे

भुसावळ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील रहिवासी व दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रतीक अनिल महाजन (वय १६) याचा शनिवारी तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नुकताच दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत प्रवेश घेण्याची तयारी सुरू असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक महाजन आणि त्याचा मित्र यश लोखंडे (वय २१) हे शनिवारी सकाळी कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. शेळगाव बॅरेज परिसरातील बँक वॉटरमध्ये बुडालेल्या लहान पुलाजवळ ते पोहोचले. यावेळी सर्वप्रथम प्रतीक पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक गटांगळ्या खाऊ लागला.

हा प्रकार पाहून यश घाबरला आणि त्याने आरडाओरड सुरू केली. जवळच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, यशने आपल्या भावाला दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती माजी नगरसेवक नितीन धांडे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. धांडे यांनी प्रतीकच्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली.

परिसरातील अनुभवी पोहणाऱ्यांच्या सुमारे दहा जणांच्या पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. जवळपास अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर प्रतीकचा शोध लागला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

प्रतीक हा अनिल महाजन यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील खासगी दुकानात काम करतात, तर आई मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. त्याला एक लहान बहीण असून त्याच्या अकाली निधनाने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सायंकाळी निघाली अंत्ययात्रा

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक निर्मल कोठारी, किरण कोलते, दीपक धांडे आदींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी ६ वाजता गंगाराम प्लॉट परिसरातील संतोषी माता मंदिराजवळील निवासस्थानातून प्रतीकची अंत्ययात्रा काढण्यात आली. शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून त्याला अखेरचा निरोप दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.