Contact Banner

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘युवाशक्ती जागर यात्रा’ उत्साहात संपन्न; हजारो विद्यार्थ्यांशी कृष्णराज महाडिक यांचा प्रेरणादायी संवाद

dr-ulhas-patil-medical-college-yuvashakti-jagar-yatra-krushnaraj-mahadik-inspired-thousands-of-students


डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘युवाशक्ती जागर यात्रा’ उत्साहात संपन्न; हजारो विद्यार्थ्यांशी कृष्णराज महाडिक यांचा प्रेरणादायी संवाद

जळगाव, दि. २९ (प्रतिनिधी): गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ निमित्त आयोजित प्रेरणादायी संवाद कार्यक्रम रविवारी (दि. २८) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात युवकांनी राष्ट्रनिर्माण, नेतृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्वात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश महाडिक यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक औक्षण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, जिल्हाध्यक्ष संदीप दादा सावळे, दौरा संपर्कप्रमुख तेजस्विनीताई दुर्गे, भाजपा जिल्हा महामंत्री, भुसावळचे उपाध्यक्ष क्रीश कोठारी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राम शिंदे, निलेश पाटील, वीरेंद्र दादा, केतकी ताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






कार्यक्रमात कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी युवकांनी शिक्षणासोबतच समाजकारण, नेतृत्वगुण आणि राष्ट्रहिताची जाणीव जोपासत देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृहात "एकच मोर्चा... युवा मोर्चा!" या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सुशोभित परिसर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू दादा यांनी केले, तर अध्यक्षीय समारोपात डॉ. उल्हास पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित मेडिकल, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेद व नर्सिंग महाविद्यालयातील व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.