धक्कादायक! डंपरखाली शेतकरी चिरडला; ४ वर्षीय नात बचावली, संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला
धक्कादायक! डंपरखाली शेतकरी चिरडला; ४ वर्षीय नात बचावली, संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळील तपत कठोरा येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेली चार वर्षीय नात सुदैवाने बचावली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावून पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तपत कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (वय ५५) हे आपल्या चार वर्षीय नात परी हिच्यासह दुचाकीवरून शेतातून घरी परतत होते. पिंप्रीसेकम रस्त्यालगतच्या शेतशिवारातील अरुंद रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी आलेला डंपर रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेनंतर आनंदा पाटील आणि त्यांची दुचाकी डंपरच्या चाकाखाली अडकली. गंभीर जखमी झालेल्या आनंदा पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या सोबत असलेली चार वर्षीय परी ही बालिका चमत्कारिकरित्या बचावली.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत डंपरखाली अडकलेली दुचाकी व मृतदेह बाहेर काढला. आनंदा पाटील यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्याच्या संतापातून ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावली. काही क्षणांतच डंपरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या दुर्दैवी घटनेमुळे तपत कठोरा व परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतशिवारातील रस्त्यांवर सुरू असलेल्या मुरूम वाहतुकीबाबत तसेच अवजड वाहनांच्या बेफिकीर हालचालींबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत