Contact Banner

शिक्षण घेता घेता मिळणार उद्योगांमधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव; विद्यापीठातर्फे रोजगाराच्या थेट संधी देणारे केळी निर्यातीसह 3 नवे अभ्यासक्रम सुरू

 

uttar-maharashtra-vidyapeeth-3-navin-rojgarabhimukh-abhyaskram-suruvat

शिक्षण घेता घेता मिळणार उद्योगांमधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव; विद्यापीठातर्फे रोजगाराच्या थेट संधी देणारे केळी निर्यातीसह 3 नवे अभ्यासक्रम सुरू

प्रतिनिधी | जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्थानिक उद्योगांना पूरक ठरणारे आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विद्या परिषदेच्या बैठकीत अभ्यासक्रमासोबतच प्रात्यक्षिक व्यवस्था व उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव देणारे तीन नवे अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये केळीवर आधारित सर्टिफिकेट इन बनाना एक्स्पोर्ट मॅनेजमेंट हा दोन क्रेडिटचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे.


uttar-maharashtra-vidyapeeth-3-navin-rojgarabhimukh-abhyaskram-suruvat


विद्या परिषदेची बैठक कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रशाळा संचालक व शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते. नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेअंतर्गत एम.एस्सी. केमिस्ट्री (स्पेशलायझेशन इन रबर टेक्नॉलॉजी) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात पहिले वर्ष विद्यापीठात पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ठाणे येथील इंडियन रबर मटेरियल इन्स्टिट्यूटमध्ये वर्षभर प्रत्यक्ष काम करून अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी व युवकांसाठी सर्टिफिकेट इन बनाना एक्स्पोर्ट मॅनेजमेंट हा दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. दहावी उत्तीर्ण पात्रता असल्याने मोठ्या प्रमाणात युवक आणि शेतकरी या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ शकतील. यामुळे केळीला जागतिक बाजारपेठेत निर्यातक्षम बनविण्यासाठी आवश्यक तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे.

वाणिज्य प्रशाळेअंतर्गत एम.कॉम. इंडस्ट्री इंटिग्रेटेड अप्लाइड अकौंटिंग अँड टॅक्सेशन हा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात महाविद्यालयात नियमित शिक्षण दिले जाईल, तर दुपारच्या सत्रात सनदी लेखापालांच्या कार्यालयात प्रत्यक्ष काम करून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीसोबतच व्यावसायिक अनुभव मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

बैठकीत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील नव्या संशोधन केंद्रांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संलग्नीकरणाचे नूतनीकरण व नव्या मान्यतांच्या प्रक्रियेलाही हिरवा कंदील दाखविण्यात आला. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष कृती आराखड्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांमधून पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर संबंधित स्वायत्त महाविद्यालयाच्या नावासोबत त्यांचा स्वतंत्र लोगो आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचाही लोगो छापला जाणार आहे. या निर्णयामुळे स्वायत्त महाविद्यालयांची स्वतंत्र ओळख कायम राहून विद्यापीठाशी असलेली संलग्नताही अधोरेखित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.