गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; डंपरसह तीन ट्रॅक्टर जप्त
गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; डंपरसह तीन ट्रॅक्टर जप्त
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरासह तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करत एक डंपर व तीन ट्रॅक्टर जप्त केले. कारवाईनंतर संबंधित चारही वाहने पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती पाचोरा दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दि. १० रोजी रात्री भडगाव पोलिसांच्या गस्ती पथकाने भडगाव-पाचोरा मार्गावर ग्रामीण रुग्णालयासमोर संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस हवालदार निलेश ब्राह्मणकर व चालक एएसआय राजू पाटील यांच्या पथकाला पांढऱ्या-निळ्या रंगाचा विनानंबर डंपर आढळून आला. तपासणीअंती सदर डंपरमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने चालक सावकार रुपला पाटील (रा. पाचोरा) याच्यासह डंपर ताब्यात घेण्यात आला. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तहसीलदार, भडगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
दरम्यान, महसूल विभागानेही स्वतंत्र दोन पथकांमार्फत अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई केली. कोठली येथून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय, भडगाव येथे जमा करण्यात आले. या कारवाईत दिनेश येंडे, समाधान हुल्लुळे, गीतेश महाजन, विवेक महाजन, योगेश पाटील, प्रशांत कुंभारे, महादू कोळी व किरण मोरे यांचा सहभाग होता.
तसेच दुसऱ्या पथकाने टोनगाव परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारा आणखी एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केला. या कारवाईत एस. के. मांडोळे, व्ही. पी. शिंदे, लोकेश महाजन, करण कुलकर्णी, प्रसाद दुदुस्कर व गौरव पगारे यांनी सहभाग घेतला.
पोलीस व महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा धडक मोहिमा सातत्याने राबविण्याची मागणी केली आहे. भडगाव तालुक्यातून तसेच इतर जिल्ह्यांकडे होणारी अवैध वाळू वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत