Contact Banner

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

 


यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

लेवाजगत न्यूज | जळगाव

जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे यावल तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.



संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तसेच ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ व वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. १० जून रोजी झालेल्या प्रारंभिक टप्प्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत व अभियान समन्वयक डॉ. नि. तु. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यातील गाडर्‍या, जामन्या आणि उसमली या गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली. यावेळी नेत्ररोग विभागासह कान-नाक-घसा तज्ज्ञांची टीमही उपस्थित होती.

या अभियानाअंतर्गत यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये २४ टप्प्यांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार आरोग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत. तपासणीत मोतीबिंदू अथवा इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण ६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रेफर करण्यात आले. तपासणीदरम्यान नागरिकांना डोळ्यांचे आरोग्य, मोतीबिंदूची लक्षणे, वेळेवर उपचारांचे महत्त्व तसेच कान-नाक-घसा विकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानासाठी डॉ. वैष्णव, डॉ. गौरव, डॉ. दर्शनी आणि डॉ. मुग्धा यांनी विशेष प्रयत्न केले. स्थानिक ग्रामस्थांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानत भविष्यातही अशी शिबिरे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

अभियानाच्या पुढील टप्प्यांत १२ जून रोजी मानपूर, मालोद, वाघझिरा व नायगाव, १५ जून रोजी मोहराळे, हरिपुरा व वद्री, १७ जून रोजी धुलेपाडा, कालाडोह व हिंगोणा, तर १९ जून रोजी डांभुर्णी, कोळन्हावी व डोणगाव येथे तज्ज्ञांची टीम भेट देणार आहे. तसेच ५ ऑगस्ट रोजी अकलूद, भालोद आणि अट्रावल येथे शिबिरांचा समारोप होणार आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ग्रामीण भागातील गरीब, गरजू व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तपासणीपासून शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देत यावल तालुक्यातील नागरिकांचे नेत्रआरोग्य सुधारण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.