Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप; नासाकडून सायबर सुरक्षा संशोधनासाठी गौरव

 


गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप; नासाकडून सायबर सुरक्षा संशोधनासाठी गौरव

लेवाजगत न्युज जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी यतीश भारंबे याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधनाच्या जोरावर जगातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) कडून अधिकृत गौरव प्राप्त केला आहे. नासाच्या Vulnerability Disclosure Program अंतर्गत त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत अधिकृत प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले आहे.

यतीश भारंबे यांनी नासाच्या माहिती सुरक्षा प्रणालीतील संभाव्य सुरक्षात्रुटी (Security Vulnerability) शोधून ती जबाबदारीने संस्थेकडे नोंदविली. त्यांच्या या संशोधनामुळे नासाच्या माहिती प्रणालीची सुरक्षितता अधिक बळकट करण्यास मदत झाल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. नासाचे वरिष्ठ एजन्सी माहिती सुरक्षा अधिकारी (Senior Agency Information Security Officer) माईक विट यांनी पाठविलेल्या प्रशंसापत्रात यतीश यांच्या स्वतंत्र सुरक्षा संशोधक म्हणून केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा हे जागतिक सुरक्षेचे महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. अशा क्षेत्रात एका भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला थेट नासाकडून अधिकृत मान्यता मिळणे ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून भारतीय विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेची जागतिक स्तरावर झालेली दखल असल्याचे मानले जात आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी यतीश यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "हे यश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संशोधन, नवोपक्रम, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न भविष्यातही सुरू राहतील."

या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी यतीश यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यतीश भारंबे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण स्व-अभ्यासाला दिले. भविष्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात अधिक संशोधन करून भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या जागतिक क्षमतेची पुन्हा एकदा प्रभावीपणे प्रचिती आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.