श्री हरि गोपाल गोशाळेचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांची उपस्थिती
श्री हरि गोपाल गोशाळेचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांची उपस्थिती
पाल तालुका रावेर , दि. २९ (प्रतिनिधी): ब्रह्मलीन परमपूज्य संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे कृपापात्र शिष्य श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आणि देशभरातील विविध संप्रदायांतील पूजनीय संत-महंतांच्या मंगल उपस्थितीत श्री हरि गोपाल गोशाळेचा उद्घाटन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी उपस्थित राहून संतांचे आशीर्वाद घेतले तसेच आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ह.भ.प. मानेकर बाबा शास्त्री, स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, महंत श्री संभूजी तीर्थ महाराज, अनंत प्रकाश शास्त्रीजी महाराज, स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, श्री श्याम चैतन्यजी महाराज, विजयदासजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी पुरुषोत्तमदासजी महाराज, स्वामी राघवानंदजी भारती, विशुद्धानंद सरस्वतीजी महाराज, भावानंदजी महाराज, गणेशगिरीजी महाराज, हरिशरणानंदजी महाराज, नाथ बाबा, गेंदानाथ महाराज तसेच ह.भ.प. भरत महाराज यांची उपस्थिती लाभली.
भारतीय संस्कृतीत गोमातेचे स्थान अत्यंत पूजनीय मानले जाते. गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून करुणा, संवेदनशीलता, पर्यावरण संवर्धन आणि समाजहिताची प्रेरणा देणारी जीवनशैली आहे. गोशाळा ही निराधार गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन आणि सेवेसाठी कार्य करणारी पवित्र संस्था असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव, संस्कार आणि मानवतेची मूल्ये अधिक दृढ होण्यास मदत होते, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
संतांच्या आशीर्वादाने आणि सत्संगाच्या पवित्र वातावरणामुळे हा उद्घाटन सोहळा अत्यंत भक्तिमय, प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला. गोसेवा, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेचा हा पवित्र संकल्प अधिकाधिक बळकट होत राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत