गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि आधुनिक सुविधांवर भर
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि आधुनिक सुविधांवर भर
लेवाजगत न्यूज जळगाव : गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी बालशिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत गोदावरी स्कूलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या नर्सरी विभागाचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद, पालक आणि चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बालशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया बालवयातच घातला जातो, असे सांगितले. बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी पूर्वप्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनानिमित्त नर्सरी विभागातील नवागत विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी आणि खेळत-शिकत शिक्षण मिळावे, या उद्देशाने शाळेत सुसज्ज वर्गखोल्या, रंगीबेरंगी शैक्षणिक साहित्य, विविध खेळणी आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गोदावरी स्कूलच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित पालकांनी स्वागत करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक आणि सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत