पुणे-नाशिक महामार्गावर तिहेरी भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू, सात जण जखमी
पुणे-नाशिक महामार्गावर तिहेरी भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू, सात जण जखमी
नारायणगाव, ता. 29 (प्रतिनिधी): पुणे-नाशिक महामार्गावरील कोठारी मारुती शोरूमसमोर रविवारी सायंकाळी झालेल्या तिहेरी भीषण अपघातात गोळेगाव (ता. जुन्नर) येथील आयटी अभियंता संजय लिंबाजी खंडागळे (वय 25) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीसह एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खंडागळे हे पत्नी कीर्ती संजय खंडागळे (वय 19) यांच्यासह कारने नारायणगावहून मंचरकडे जात होते. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला.
या अपघातात कीर्ती खंडागळे या गंभीर जखमी झाल्या असून दुसऱ्या वाहनातील ऋतिका नामदेव कदम (28), माया नामदेव कदम (58), ऋषिकेश नामदेव कदम (30), नामदेव भिवाजी कदम (59), रुचिका ऋषिकेश कदम (27) तसेच वाहनचालक अझरुद्दीन काझी (सर्व रा. डीएसपी चौक, अहिल्यानगर) हे जखमी झाले आहेत.
अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके तसेच पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेले सेवानिवृत्त अभियंता हनुमंत भापकर यांनी पोलिसांना दिली. मुसळधार पावसामुळे महामार्गावर पाणी साचल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत