Contact Banner

थोरगव्हाणच्या सूनबाई प्रणाली चौधरी ठरल्या ‘सावित्री, कोरोनामुळे अंधत्व आलेल्या पतीसाठी पत्नीचा पाच वर्षांचा संघर्ष ’

 

sonai-savitri-pranali-chaudhary-five-year-struggle-for-blind-husband-thorgavhan-raver

कोरोनामुळे अंधत्व आलेल्या पतीसाठी पत्नीचा पाच वर्षांचा संघर्ष; थोरगव्हाणच्या सूनबाई प्रणाली चौधरी ठरल्या ‘सावित्री’






सोनई, ता. २८ (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हजारो गरजूंना मदतीचा हात देणारे सोनई येथील प्रवीण चौधरी यांनाच कोरोनाने गाठले आणि त्यानंतर झालेल्या म्युकरमायकोसिसमुळे त्यांच्या आयुष्याला मोठे वळण मिळाले. एका डोळ्याची दृष्टी गमावलेले आणि दुसऱ्या डोळ्यावरही गंभीर परिणाम झालेल्या पतीसाठी पत्नी प्रणाली चौधरी यांनी गेल्या पाच वर्षांपासून अहोरात्र सेवा करत सावित्रीप्रमाणे समर्पणाची प्रेरणादायी गाथा उभी केली आहे. विशेष म्हणजे, रावेर तालुक्यातील थोरगव्हाण हे त्यांचे सासर असून त्यांच्या या त्यागाची सर्वत्र चर्चा होत आहे.

सोनई येथील मुळा साखर कारखान्यात सुरक्षाधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रवीण चौधरी हे समाजसेवेसाठी ओळखले जात होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी अनेक गरजू रुग्णांना आयुर्वेदिक काढा घरपोच पोहोचवला, विविध आजारांवरील आयुर्वेदिक औषधे मोफत दिली, सर्पमित्र म्हणून अनेकांचे प्राण वाचवले तसेच मुळा कारखान्याच्या मदतीने तयार करण्यात आलेले सॅनिटायझर शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांना विनामूल्य उपलब्ध करून दिले.

मात्र इतरांच्या मदतीसाठी धावत असतानाच ९ मे २०२१ रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार झाला. उपचारासाठी पुण्यात दाखल केल्यानंतर त्यांचा एक डोळा काढावा लागला. दुसऱ्या डोळ्यावरही संसर्ग झाल्याने तोही काढण्याची वेळ आली होती. डॉक्टरांनी त्यासाठी परवानगी मागितली, मात्र पत्नी प्रणाली चौधरी यांनी धीर न सोडता देवावर विश्वास ठेवत दुसरा डोळा काढण्यास नकार दिला. "दोन्ही डोळे गेले तर पुढील आयुष्य कसे जगायचे?" या विचाराने त्यांनी शेवटपर्यंत उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

पतीच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या नोकरीची संधीही सोडली. रुग्णालयात उपचार सुरू असताना दर दोन तासांनी डोळ्यात औषध टाकावे लागत असल्याने सलग दोन महिने त्या दोन तासांपेक्षा अधिक झोपू शकल्या नाहीत. पतीची औषधे, जेवण, दैनंदिन कामे, फिरायला नेणे, मानसिक आधार देणे अशा प्रत्येक जबाबदारी त्यांनी हसतमुखाने पार पाडली.

या कठीण संघर्षात त्यांनी कुटुंबाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. मुलगा संचित चौधरी याचे शिक्षण खंडित होऊ दिले नाही. त्याने केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक पूर्ण करून सध्या एमबीएचे शिक्षण सुरू ठेवले आहे.

आज उपचारांमुळे प्रवीण चौधरी यांना एका डोळ्याने किंचित दिसू लागले असून त्यांच्या कुटुंबासाठी तो आशेचा किरण ठरला आहे. पत्नीच्या सेवेमुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो, अशी भावना प्रवीण चौधरी व्यक्त करतात.

"गेली पाच वर्षे प्रणाली माझी सावली बनून उभी आहे. एका डोळ्यात औषध टाकण्यापासून जेवण भरविणे, बाहेर फिरायला नेणे, प्रत्येक क्षणी तिने माझी साथ सोडली नाही. मला नवजीवन देण्याचे श्रेय तिचेच आहे. ती मला सात जन्म नव्हे, तर प्रत्येक जन्मी पत्नी म्हणून लाभावी, हीच देवाकडे प्रार्थना आहे," असे भावनिक उद्गार प्रवीण चौधरी यांनी काढले.

प्रणाली चौधरी यांच्या त्याग, समर्पण आणि पतीसेवेची दखल घेत पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त त्यांना 'सावित्री रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पतीसाठी स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता संकटाशी दोन हात करणाऱ्या आणि कुटुंबाला नवसंजीवनी देणाऱ्या थोरगव्हाणच्या सूनबाई प्रणाली चौधरी यांचा हा संघर्ष आजच्या समाजासाठी निष्ठा, प्रेम आणि समर्पणाचा आदर्श ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.