जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा मार्ग मोकळा? रेश्मा काळे यांची माघार, नंदूभाऊ महाजन यांच्या विजयाच्या आशा बळावल्या
जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा मार्ग मोकळा? रेश्मा काळे यांची माघार, नंदूभाऊ महाजन यांच्या विजयाच्या आशा बळावल्या
जळगाव, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदूभाऊ महाजन यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर जळगावातील शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनीही मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.
मुंबईत झालेल्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रेश्मा काळे यांनी माध्यमांशी बोलताना आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, शुक्रवारी जळगावात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील घडामोडींनंतर जळगावातील प्रश्नही सुटल्याचे सांगितले. तसेच काही अपक्ष उमेदवार आणि महाविकास आघाडीतील नेतेही संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट करत आपण निवडणुकीच्या मैदानात कायम राहणार असल्याची भूमिका जाहीर केली.
रेश्मा काळे यांच्या माघारीनंतर महायुतीचे उमेदवार नंदूभाऊ महाजन यांची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत असून, निवडणुकीतील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत