नवीन पाईपलाईन जोडणीसाठी ₹२,५०० वसुलीचा आरोप; फैजपुरातील नागरिकांची चौकशीची मागणी
नवीन पाईपलाईन जोडणीसाठी ₹२,५०० वसुलीचा आरोप; फैजपुरातील नागरिकांची चौकशीची मागणी
फैजपुर, प्रतिनिधी : फैजपुर शहरातील वार्ड क्रमांक १ (अ) तहा नगर परिसरातील नागरिकांनी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणीच्या नावाखाली प्रति नळ कनेक्शनधारकाकडून ₹२,५०० रक्कम वसूल करण्यात येत असल्याचा आरोप करत नगरपालिका प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात पूर्वी २ इंची पाणीपुरवठा पाईपलाईन कार्यरत होती. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नगरपालिकेमार्फत ४ इंची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, या नवीन पाईपलाईनवर विद्यमान नळ कनेक्शने जोडण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी ₹२,५०० आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ते आधीपासूनच नियमित नळ कनेक्शनधारक आहेत. पाईपलाईन बदलणे किंवा अद्ययावत करणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकणे अन्यायकारक आहे. काही नागरिकांनी संबंधित रक्कम दबावाखाली भरावी लागल्याचाही दावा केला आहे.
या संदर्भात मुस्तकीम खान सलीम खान मणियार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, जुनी नळ कनेक्शने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नवीन पाईपलाईनला जोडावीत आणि ज्या नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे त्यांना ती परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांवर तातडीने आणि योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले असून नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत