JSW जेट्टीवरील स्फोटात दोघांचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
JSW जेट्टीवरील स्फोटात दोघांचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
उरण | प्रतिनिधी-
जेएनपीटी परिसरातील JSW ऑइल जेट्टीवर आज सकाळी तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील करावली येथील रहिवासी राजेंद्र शिंदे (बेन्झोप्लास्ट कंपनीचे अधिकारी) तसेच उरण तालुक्यातील पिरकोन येथील जगन्नाथ गावंड (कंत्राटी कामगार) यांचा समावेश आहे.
घटनेनंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, पिगिंगसारख्या धोकादायक प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेले सुरक्षा नियम आणि मानके काटेकोरपणे पाळणे गरजेचे असते. मात्र, या कामादरम्यान सुरक्षा उपकरणे, गॅस तपासणी, कामासाठी आवश्यक परवानग्या आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये त्रुटी राहिल्याचा आरोप काही कामगारांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
जेएनपीटी प्रशासनाने दुर्घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक तपासणी अहवालानंतरच स्फोटामागील कारण समोर येण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जेट्टीवरील संबंधित कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे समजते.
या दुर्घटनेमुळे औद्योगिक प्रकल्पांमधील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत