माजी मुख्याध्यापिका ललिता किरंगे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नूतन प्राथमिक विद्यामंदिरला एक लाखांचा डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट
माजी मुख्याध्यापिका ललिता किरंगे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नूतन प्राथमिक विद्यामंदिरला एक लाखांचा डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट
चिनावल (लेवजगत न्यूज प्रतिनिधी) : नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावलच्या माजी मुख्याध्यापिका ललिता हुना किरंगे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शाळेत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांनी शाळेला सुमारे एक लाख रुपये किमतीचा अत्याधुनिक डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट दिला.
सन १९८५ ते २००९ या कालावधीत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना ललिता किरंगे यांनी शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळाली. विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. त्यांच्या कार्यकाळात मुरलीधर देवराम पाटील, ठगू कृष्णा नेमाडे आणि इंदू जनार्दन भारंबे यांनीही शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल तसेच नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या वतीने ललिता किरंगे यांच्यासह सर्व माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तुषार किरंगे व त्यांचे संपूर्ण कुटुंब अमेरिकेतून विशेष उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील भास्कर महाजन होते. यावेळी चेअरमन खेमचंद्र गोवर्धन पाटील, सचिव गोपाळ देवचंद पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र वामन फालक, संचालक अनिल सुधाकर किरंगे, दामोदर यादव महाजन, गिरीश किरंगे व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांनी प्रास्ताविकातून ललिता किरंगे यांच्या कार्याचा गौरव केला, तर हर्षाली कोल्हे यांनी डिजिटल स्मार्ट बोर्डच्या प्रभावी वापराचे महत्त्व विशद करून आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची गरज अधोरेखित केली. ऋतुजा किरंगे व सार्थक किरंगे यांनी आपल्या आजीविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या प्रेमळ स्वभाव, कर्तृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सपना टोके, विनिता नारखेडे, कविता नेमाडे, मिलिंद गारसे, कविता पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना नेमाडे यांनी केले, तर संतोष आसाराम काळे यांनी आभार मानले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले. माजी शिक्षकांचा सन्मान, आधुनिक शिक्षणासाठी डिजिटल स्मार्ट बोर्डची भेट आणि सर्व पिढ्यांना एकत्र आणणारा हा प्रेरणादायी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत