Contact Banner

पिंपळे गुरव येथे लेवा पाटीदार समाजाच्या सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

leva-patidar-social-counselling-and-family-dispute-resolution-centre-inaugurated-at-pimpri-gurav-pune


पिंपळे गुरव येथे लेवा पाटीदार समाजाच्या सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने पिंपळे गुरव येथे स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र, पुणे विभागीय केंद्राचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष अरुणदादा बोरोले यांच्या हस्ते शनिवारी (दि. २७) सुदर्शन नगर येथील परमपूज्य पितामह भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी समुपदेशन समितीतील निवृत्त न्यायाधीश संजय पाटील, डॉ. दिनेश नेहेते, ॲड. महेश ढाके, मनोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल जवळे, रमेश वारके, समुपदेशिका प्रतिभाताई राणे, ॲड. पायल चौधरी, विभावरी इंगळे, किरणताई पाचपांडे, विजयाताई जंगले आणि कृष्णाजी खडसे यांची उपस्थिती होती.






प्रास्ताविकात महासंघाचे उपाध्यक्ष व लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागरचे अध्यक्ष विकास वारके यांनी समितीची रचना व उद्दिष्टे स्पष्ट करताना कायदेतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ व व्यवस्थापन तज्ज्ञांचा समावेश असल्याने ही समिती सर्वसमावेशक व संतुलित असल्याचे सांगितले.

महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी समुपदेशन केंद्राच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा करताना समाजातील वाढते कौटुंबिक वाद, घटस्फोटाचे प्रमाण आणि त्यावरील उपाय म्हणून समुपदेशनाची गरज अधोरेखित केली. योग्य मार्गदर्शनाद्वारे अनेक कुटुंबे वाचू शकतात व समाजव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी तरुणांमध्ये संयमाची कमतरता आणि किरकोळ कारणांवरून निर्माण होणारे वैवाहिक वाद यावर भाष्य करत अशा समुपदेशन केंद्रांची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. रविंद्र भोळे, डॉ. दिनेश नेहेते, ॲड. महेश ढाके, रमेश वारके तसेच कृष्णाजी खडसे यांनीही मार्गदर्शन केले. विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन, मुलांमधील नैराश्य, पौगंडावस्थेतील समस्या, कौटुंबिक कलह तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवरही या केंद्रातून मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

उपस्थितांनी या उपक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनून केंद्राची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन अरुण बोरोले यांनी केले. गरज भासल्यास समिती सदस्यांनी संबंधितांच्या घरी जाऊनही समुपदेशन करावे, अशी सूचना कृष्णाजी खडसे यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिलीप चौधरी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.