Contact Banner

पिंपळे गुरव येथे लेवा पाटीदार समाजाच्या ‘सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्रा’चे उद्घाटन संपन्न; घटस्फोट रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – अरुण बोरोले

lewa-patidar-family-counselling-centre-inaugurated-at-pimpri-gurav-pune


पिंपळे गुरव येथे लेवा पाटीदार समाजाच्या ‘सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्रा’चे उद्घाटन संपन्न; घटस्फोट रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – अरुण बोरोले


पुणे (लेवाजगत न्यूज पिंपळे गुरव) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने संचलित ‘सामाजिक समस्या व कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र – पुणे विभागीय केंद्र’ चे उद्घाटन शनिवारी (दि. २७ जून) पिंपळे गुरव येथील परमपूज्य पितामह भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात महासंघाचे अध्यक्ष अरुणदादा बोरोले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, महिला-भगिनी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुपदेशन समितीत निवृत्त न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, प्रशिक्षित समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक आणि व्यवस्थापन तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समाजातील विविध कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र कार्यरत राहणार आहे.





महासंघाचे उपाध्यक्ष तथा लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे सौदागरचे अध्यक्ष विकास वारके यांनी प्रास्ताविकात समितीची माहिती देताना अनुभवी व तरुण सदस्य, महिला-पुरुष, कायदेतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समतोल सहभाग असल्यामुळे समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर अरुण बोरोले यांनी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी वाढत्या कौटुंबिक कलहाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन केंद्राची आवश्यकता स्पष्ट केली. “घटस्फोट टाळता येऊ शकतो, मात्र त्यासाठी योग्य वेळी समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंब व्यवस्था टिकली तर समाज अधिक सक्षम बनेल. प्रत्येक समाजबांधवाने या केंद्राचा ब्रँड ॲम्बेसेडर बनून गरजूंपर्यंत या सेवांची माहिती पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी केले.


महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि दातृत्वाची भावना जोपासण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक व कौटुंबिक समस्यांचे योग्य समुपदेशन झाल्यास समाज अधिक संघटित व सक्षम बनेल, असे त्यांनी सांगितले. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रविंद्र भोळे यांनी समाजात समुपदेशनाची गरज अधोरेखित करत सकारात्मक विचारांची प्रेरणा दिली.


निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. दिनेश नेहेते यांनी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, समाज टिकवायचा असेल तर कुटुंब व्यवस्था मजबूत राहणे आवश्यक आहे. नवरा-बायकोतील स्पर्धेपेक्षा समन्वय आणि सहकार्य महत्त्वाचे असून एकमेकांचे म्हणणे समजून घेणे, प्रेमाने संवाद साधणे आणि अडचणीत असलेल्या कुटुंबांना योग्य वेळी मदत करणे हीच समुपदेशनाची खरी ताकद आहे. समाजातील प्रत्येकाने या उपक्रमाची माहिती आपल्या परिसरात पोहोचवून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.


ॲड. महेश ढाके यांनी कायद्याच्या चौकटीत राहून गरजूंना योग्य न्याय व मार्गदर्शन देण्याची भूमिका स्पष्ट केली, तर रमेश वारके यांनी आजच्या परिस्थितीत अशा समुपदेशन केंद्राची नितांत गरज असल्याचे सांगून आपले पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. कृष्णाजी खडसे यांनी विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन, कौटुंबिक वाद, युवकांमधील नैराश्य, पौगंडावस्थेतील समस्या, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी तसेच इतर सामाजिक प्रश्नांवर या केंद्रातून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती दिली. आवश्यकतेनुसार समिती सदस्य संबंधितांच्या घरी जाऊनही समुपदेशन करतील, ज्यामुळे समाजात या उपक्रमाबाबत अधिक विश्वास निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.


या समुपदेशन समितीत निवृत्त न्यायाधीश संजय पाटील, डॉ. दिनेश नेहेते, ॲड. महेश ढाके, डॉ. अमोल जवळे, रमेश वारके, सौ. प्रतिभा राणे, ॲड. पायल चौधरी, सौ. विभावरी इंगळे, सौ. किरण पाचपांडे, सौ. विजया जंगले आणि कृष्णाजी खडसे यांचा समावेश असून ही समिती समाजातील सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक समस्यांवर मार्गदर्शन व समुपदेशन करून सुदृढ कुटुंब आणि सशक्त समाज घडविण्यासाठी कार्य करणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पायल चौधरी यांनी केले, तर दिलीप चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.