Contact Banner

महादेव हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय रुग्णावर ड्युअल-चेंबर पेसमेकर यशस्वी; हृदयगती पूर्ववत

 

jalgaon-mahadev-hospital-gives-new-life-to-heart-patient-with-pacemaker


महादेव हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय रुग्णावर ड्युअल-चेंबर पेसमेकर यशस्वी; हृदयगती पूर्ववत

लेवाजगत न्यूज जळगाव : शहरातील महादेव हॉस्पिटलमध्ये हृदयविकार उपचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय यश नोंदविण्यात आले आहे. हृदयाची गती अत्यंत मंद झालेल्या ६५ वर्षीय रुग्णावर ड्युअल-चेंबर परमानेंट पेसमेकर बसविण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

jalgaon-mahadev-hospital-gives-new-life-to-heart-patient-with-pacemaker


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला हृदयाच्या विद्युत वहन व्यवस्थेतील बिघाडामुळे वारंवार चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे अशा तक्रारी होत्या. तपासणीनंतर त्याच्यावर पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक भूल देऊन शिरेमार्गे हृदयात आवश्यक लीड्स बसविण्यात आल्या आणि त्या त्वचेखाली बसवलेल्या पल्स जनरेटरशी जोडण्यात आल्या. या यंत्रणेमुळे हृदयाची गती नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची हृदयगती सामान्य पातळीवर आली असून प्रकृती स्थिर असल्याने त्याला आवश्यक सूचनांसह रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, कम्प्लीट हार्ट ब्लॉक, एव्ही ब्लॉक आणि सिक सायनस सिंड्रोम यांसारख्या गंभीर हृदयविकारांमध्ये ड्युअल-चेंबर पेसमेकर प्रभावी उपचार पर्याय ठरतो. चक्कर येणे, नाडी मंदावणे, अचानक थकवा जाणवणे किंवा बेशुद्ध पडणे यांसारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रक्रियेत डॉ. सहर हमदुले, डॉ. सैयद झीशान, डॉ. आकाश पवार आणि डॉ. केदारनाथ देशमुख यांनी सहकार्य केले. या यशस्वी उपचारामुळे जिल्ह्यात आधुनिक हृदयविकार उपचार सुविधा अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.