मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर यावल येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश
मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर यावल येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश
जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : मुस्लिम बांधवांचा मोहरम सण शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी साजरा होत असल्याने यावल शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यावल येथील नियमित आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
मोहरम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने व्यापारी व नागरिकांची अतिरिक्त गर्दी होऊन वाहतूक कोंडी तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अधिनियम, १८६२ मधील कलम ५ (अ) व (क) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. २६ जून २०२६ रोजी यावल शहरातील नियमित आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, व्यापारी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदर आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत