Contact Banner

पळस्पे–कोन उड्डाणपूल प्रकल्पातील अडचणींवर भाजप युवा नेते अतुल घरत आक्रमक; 'शून्य अपघात' अभियानासह प्रकल्पग्रस्तांना न्याय व सुरक्षित वाहतुकीची मागणी

 

palaspe-kon-flyover-project-issues-atul-gharat-demands-road-safety-and-justice-for-projec


पळस्पे–कोन उड्डाणपूल प्रकल्पातील अडचणींवर भाजप युवा नेते अतुल घरत आक्रमक; 'शून्य अपघात' अभियानासह प्रकल्पग्रस्तांना न्याय व सुरक्षित वाहतुकीची मागणी


उरण (सुनिल ठाकूर) : उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या पळस्पे–कोन उड्डाणपूल व रस्ते प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना मोबदला, वाहतूक नियोजन, सुरक्षा उपाययोजना आणि कामातील विलंब यांसारख्या गंभीर प्रश्नांमुळे अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते अतुल घरत यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.





पळस्पे ते कोन (रोड मार्क ० ते १७००) या टप्प्यात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचा मोबदला अद्याप प्रलंबित असल्याने विकासकामांचा वेग मंदावला आहे. महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि MMRDA यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नियोजनात त्रुटी असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. ही बाब लक्षात येताच अतुल घरत यांनी आमदार महेश बालदी यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.


फेब्रुवारी ते जून २०२६ या कालावधीत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. रस्ते सुरक्षेसह पावसाळ्यातील सांडपाणी व वाहतूक कोंडीबाबत स्थानिक नागरिकांनी रायगड जिल्हा परिषद सदस्या हर्षदा अतुल घरत यांच्या कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत २६ जून रोजी अतुल घरत, गोरखनाथ धुमाळ, रवी शेळके, हरीश घरत, पत्रकार साबीर शेख, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सकपाळ तसेच गोवर कन्स्ट्रक्शनच्या प्रतिनिधींसह पळस्पे ते कोन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.


पाहणीदरम्यान अपघातप्रवण ठिकाणे, धोकादायक वळणे, क्रॉसिंग, वाहतूक नियंत्रण, पावसाच्या पाण्याचा निचरा, सूचना फलक, गटारे, यू-टर्न आणि इतर सुरक्षाविषयक बाबींची तपासणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न व विकासकामांतील अडचणींवरही चर्चा करण्यात आली.


डी-मार्ट परिसर हा प्रकल्पाचा 'झिरो पॉइंट' मानण्यात आला असून तेथून कोन चौकीपर्यंत १७०० रोड मार्क निश्चित करण्यात आले आहेत. या परिसरातील भारत पेट्रोलियमलगतचा वैभव पेट्रोल पंप, ट्रेलरची वर्दळ, झाडे, शेतकऱ्यांचा मोबदला, कार शोरूम, यू-टर्न, गटारे आणि विविध क्रॉसिंग ही वाहतुकीसाठी धोकादायक ठिकाणे असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांशी समन्वय साधून सकारात्मक मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अतुल घरत यांनी सांगितले.


"विकास महत्त्वाचा आहे; मात्र तो नागरिकांच्या जीवाशी खेळून होऊ नये. प्रकल्पग्रस्तांना न्याय, सुरक्षित रस्ते आणि 'शून्य अपघात' हेच आमचे ध्येय आहे. रस्ते विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे," असे अतुल घरत यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त, अधिकारी आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


 "पळस्पे–कोन मार्गावरील वाहतूक कमी करण्यासाठी एक्सप्रेस उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. मात्र कोन वाहतूक पोलीस चौकी परिसरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच पळस्पे उड्डाणपूल थेट द्रुतगती महामार्गाशी जोडला जात नसून तो जुन्या मुंबई–पुणे महामार्ग आणि रसायनी–सावळा मार्गाशी जोडला जात असल्याने भविष्यातील वाहतूक नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे," असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पत्रकार साबीर शेख यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.