Contact Banner

माजी आमदार राजाराम गणू महाजनांनंतर तांदलवाडीच्या नंदकिशोर महाजनांची विधानपरिषदेत दमदार एंट्री

 

tandalwadi-gets-second-legislative-representation-as-nandkishor-mahajan-wins-mlc-election

लेवाजगत



tandalwadi-gets-second-legislative-representation-as-nandkishor-mahajan-wins-mlc-election

तांदलवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नंदकिशोर महाजन यांच्या विजयाने गावात जल्लोष

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सावदा-

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर (नंदू) महाजन यांनी दणदणीत विजय मिळवत रावेर तालुक्यातील तांदलवाडी गावाच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक नोंद केली आहे. बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी राखत महाजन यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला आकडा गाठला. त्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमातील मतमोजणीची गरजच भासली नाही. त्यांना तब्बल ५७७ मते मिळाल्याने त्यांनी एकतर्फी विजय संपादन केला.

तांदलवाडी गावाला यापूर्वी माजी आमदार राजाराम गणू महाजन यांच्या माध्यमातून विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले होते. आता नंदकिशोर महाजन यांच्या विजयामुळे राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळवणारे ते गावातील दुसरे नेते ठरले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली असून, या विजयाचे विशेष महत्त्व मानले जात आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघातील तांदलवाडी गावात विजयाची बातमी समजताच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल उधळत आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. "तांदलवाडीचा सुपुत्र विधानपरिषदेत" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही हा क्षण ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली. राजाराम गुरू महाजन यांच्यानंतर पुन्हा एकदा तांदलवाडी गावाच्या नावाची राज्य पातळीवर चर्चा होत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. नंदकिशोर महाजन यांच्या विजयामुळे मुक्ताईनगर मतदारसंघासह रावेर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विविध ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

लेवा जगत न्यूज
विशेष प्रतिनिधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.