Contact Banner

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

 

samruddhi-highway-fatal-accident-chandrapur-family-of-five-killed

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू



अमरावती , दि. २८ : समृद्धी महामार्गावर रविवारी (२८ जून) दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास धामणगाव रेल्वेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरहून अमरावतीकडे कारने प्रवास करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.






मृतांमध्ये भास्कर महादेव जीवने (वय ४३), महादेव जिवाजी जीवने (६५), लताबाई महादेव जीवने (६०), आरती भास्कर जीवने (४१) आणि जिज्ञा भास्कर जीवने (१२) यांचा समावेश आहे. हे सर्वजण चंद्रपूर शहरातील शासकीय डी.एड. महाविद्यालयामागील बहुपेठ परिसरातील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जीवने कुटुंबीयांची कार समृद्धी महामार्गावरील धामणगाव रेल्वेजवळील चॅनेज क्रमांक १०५ परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार जाऊन आदळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट कंटेनरच्या मागील बाजूस घुसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. त्यामुळे कारमधील पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिस, महामार्ग पोलिस आणि जिल्हा वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

या भीषण अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच जीवने कुटुंबीयांच्या नातेवाईकांमध्ये व परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.