वादळी वाऱ्याचा तडाखा! सावदा-फैजपूरात गारपीट, झाडे कोसळली; शेती पिकांचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्याचा तडाखा! सावदा-फैजपूरात गारपीट, झाडे कोसळली; शेती पिकांचे मोठे नुकसान
लेवाजगत न्यूज | सावदा-फैजपूर-
सावदा व फैजपूर परिसरात आज शनिवारी दुपारी अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याबरोबरच शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भुसावळ-रावेर महामार्गावरील डी. एन. कॉलेजसमोर एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी तेथून जात असलेली भुसावळ-रावेर बस थोडक्यात बचावली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सावदा शहरातील साईबाबा मंदिराजवळही एक भलेमोठे झाड कोसळल्याने परिसरात घबराट पसरली. जोरदार वाऱ्यामुळे काही घरांवरील सोलर पॅनल उडून नुकसान झाले आहे.
लक्ष्मीनारायण नगर परिसरात एक लिंबाचे झाड वीजवाहिनीवर पडल्याने वीज खांब वाकला असून विद्युत तारा धोकादायक स्थितीत आल्या आहेत. परिणामी काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून महावितरणचे कर्मचारी तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे केळी, मका, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक शेतांमध्ये पिके आडवी पडली असून फळबागांनाही फटका बसला आहे. नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून हवामानातील बदल लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घेण्याचे सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत