थोरगव्हाण परिसरात वीज पुरवठ्याचा लपंडाव; शेतकरी संकटात, तीव्र आंदोलनाचा इशारा
थोरगव्हाण परिसरात वीज पुरवठ्याचा लपंडाव; शेतकरी संकटात, तीव्र आंदोलनाचा इशारा
लेवाजगत न्युज सावदा प्रतिनिधी:-
थोरगव्हाण परिसरात गेल्या दीड महिन्यापासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेतीपिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिकांची वाढ खुंटत असून आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर थोरगव्हाण येथील शेतकऱ्यांनी सावदा येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, थोरगव्हाण फिडरवरील वीज पुरवठा मागील एक ते दीड महिन्यांपासून अत्यंत अनियमित झाला आहे. दिवसा तसेच रात्रीदेखील वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतातील मोटार पंप बंद पडत आहेत. परिणामी पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नसून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता वीजटंचाईचे नवे संकट उभे ठाकले आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता डी. आर. कोल्हे तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील यांची भेट घेऊन समस्येची गंभीरता मांडली. महावितरणकडे कर्मचारी अपुरे असल्यास आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देऊन बिघाड दूर करावेत व वीज पुरवठा नियमित करावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज पुरवठा लवकर पूर्ववत न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि महावितरणला जाब विचारला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य सचिन चौधरी, उपसरपंच नितीन चौधरी, उमाकांत बाऊस्कर, भागवत झोपे, प्रकाश चौधरी, शेखर बाऊस्कर, दीपक बाऊस्कर, सिद्धेश्वर पाटील, सोनल राणे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत