Contact Banner

कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनास्थळी रक्ताचा सडा

varangaon-car-bike-accident-four-killed-near-bhusawal


कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनास्थळी रक्ताचा सडा

लेवाजगत न्यूज वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) : सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरा मारुती मंदिराजवळ शुक्रवारी (ता. ५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव कारने दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील सर्वजण हवेत उडून रस्त्यावर दूरवर फेकले गेले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.


varangaon-car-bike-accident-four-killed-near-bhusawal


मृतांमध्ये ऐश्वर्या बहादूर भोसले (३०), विजय शंकर काळे (१९), विघ्नेश शंकर चव्हाण (१४) आणि मोनालिसा भोसले (१) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे वरणगाव परिसरात शोककळा पसरली असून आदिवासी समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

लस्सीचा बेत ठरला अखेरचा प्रवास

मूळचे मलकापूर (जि. बुलडाणा) येथील फासेपारधी समाजातील काही कुटुंबे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वरणगावातील कपिलनगर परिसरात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी विजय काळे हा त्याची मामी ऐश्वर्या भोसले, विघ्नेश चव्हाण आणि एक वर्षांची मोनालिसा भोसले यांना दुचाकीवरून बाजारासाठी वरणगावकडे घेऊन जात होता. उन्हाच्या कडाक्यात लस्सी पिण्याचाही त्यांचा बेत होता. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.

हिरा मारुती मंदिराजवळ पोहोचताच समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने (एमएच १९ ईव्ही ५३५३) त्यांच्या दुचाकीला (एमएच २२ बीडी ३६८१) समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चौघेही हवेत उडून रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.


varangaon-car-bike-accident-four-killed-near-bhusawal


धावपळ अन् रुग्णालयात आक्रोश

अपघाताचा मोठा आवाज ऐकून नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या सर्वांना त्वरित जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिघांचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला होता, तर एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी हंबरडा फोडला. नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहून रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकही भावुक झाले.

कठोर कारवाईची मागणी

या भीषण दुर्घटनेनंतर वरणगाव तसेच आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निष्पाप चौघांचा बळी घेणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.