Contact Banner

विठ्ठल मंदिर सावदा ते पंढरपूर यात्रेचे आयोजन; दोन बसद्वारे ७० हून अधिक भाविक रवाना

 

Savda-Pandharpur-Vitthal-Yatra-70-Bhavik

विठ्ठल मंदिर सावदा ते पंढरपूर यात्रेचे आयोजन; दोन बसद्वारे ७० हून अधिक भाविक रवाना

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : सावदा येथील श्री विठ्ठल मंदिराच्या वतीने अधिक (पुरुषोत्तम) मासानिमित्त सावदा ते पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ७० हून अधिक भाविक सहभागी झाले आहेत.


Savda-Pandharpur-Vitthal-Yatra-70-Bhavik


यात्रेसाठी सजविण्यात आलेल्या बसचे पूजन माजी नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठित समाजसेवक राजेंद्र चौधरी व सौ. हेमांगी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. नारळ फोडून तसेच विठ्ठलाच्या नामस्मरणात यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजता सावदा येथून दोन बसद्वारे यात्रेला प्रारंभ झाला. दि. १२ रोजी पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार असून दर्शनानंतर यात्रा परतीच्या मार्गाने रवाना होणार आहे.

या यात्रेच्या आयोजनासाठी काही दानशूर भाविकांनी कोणतीही प्रसिद्धी अथवा नाव जाहीर न करता गुप्त स्वरूपात आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या या निस्वार्थ योगदानामुळे भाविकांना अल्प खर्चात पंढरीच्या दर्शनाचा लाभ मिळत असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, भाविकांना नियमितपणे पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे, यासाठी दर एकादशीला सावदा ते पंढरपूर अशी एसटी बसद्वारे यात्रा आयोजित करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे अधिकाधिक भाविकांना पंढरीच्या दर्शनाचा लाभ मिळणार असून धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या धार्मिक उपक्रमास सावदा परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून भविष्यातही अशा भक्तिमय यात्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यात्रेच्या प्रस्थानावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.