४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून ३.५ किलोची गाठ यशस्वीरीत्या काढली डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून ३.५ किलोची गाठ यशस्वीरीत्या काढली
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव | लेवाजगत न्यूज
सतत पोटदुखी, पोटात जडपणा, दबाव जाणवणे आणि असामान्य रक्तस्त्राव अशा गंभीर त्रासांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भपिशवीतून तब्बल ३.५ किलो वजनाची मोठी गाठ काढण्यात यश मिळविले. वेळेवर निदान आणि तातडीने करण्यात आलेल्या उपचारांमुळे महिलेची प्रकृती आता स्थिर असून ती जलद गतीने बरी होत आहे.
जळगाव तालुक्यातील संबंधित महिलेला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखी, पोटात जडपणा, दबाव जाणवणे तसेच अनियमित रक्तस्त्रावाचा त्रास होत होता. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने तिने उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी महिलेची सविस्तर तपासणी केली. सोनोग्राफी आणि आवश्यक रक्ततपासण्यांमध्ये गर्भपिशवीमध्ये सुमारे २० बाय २० सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ असल्याचे निदान झाले. याशिवाय गर्भपिशवीत आणखी काही लहान गाठीही असल्याचे स्पष्ट झाले.
गाठीचा आकार मोठा असल्याने आणि त्यामुळे आसपासच्या अवयवांवर दबाव निर्माण होत असल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अत्यंत काळजीपूर्वक पार पडली शस्त्रक्रिया
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. ऐश्वर्या चलवदे यांच्या अनुभवी टीमने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवीतील तब्बल ३.५ किलो वजनाची मोठी गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. तसेच इतर लहान गाठींसह संपूर्ण गर्भपिशवीही काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती समाधानकारक असून तिची प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका : तज्ज्ञांचा सल्ला
याबाबत माहिती देताना डॉ. प्राजक्ता पाटील यांनी सांगितले की, महिलांना पोटदुखी, पोट फुगणे, पोटात जडपणा किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा लक्षणांमागे गर्भपिशवीतील गाठीसारखे गंभीर कारण असू शकते. वेळेवर तपासणी, अचूक निदान आणि योग्य उपचार केल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या करता येतात. या प्रकरणात वेळेत निदान झाल्यामुळे रुग्णावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत