३१८ वर्षांनंतर जालना शहरात प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील गोल रिंगण संपन्न
३१८ वर्षांनंतर जालना शहरात प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील गोल रिंगण संपन्न
जालना | प्रतिनिधी-तब्बल ३१८ वर्षांनंतर प्रथमच जालना शहरात श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील गोल रिंगण भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडले. वारकरी संप्रदायाच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, अभंग-भजनांचा स्वर आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "संत मुक्ताबाई महाराज की जय"च्या जयघोषाने संपूर्ण जालना शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. पारंपरिक पद्धतीने गोल रिंगणाचा सोहळा पार पडला. रिंगणावेळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत संत मुक्ताबाईंच्या चरणी श्रद्धापूर्वक नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
या ऐतिहासिक क्षणामुळे जालना शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एका नव्या पर्वाची नोंद झाली. वारकरी संप्रदायासाठी हा अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. "हा सुखाचा सोहळा स्वर्गी नाही," अशी भावना अनेक वारकरी आणि भाविकांनी व्यक्त केली.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तसेच पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था केली. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेनेही चोख नियोजन करून सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडला.
भक्ती, समता, बंधुभाव आणि वारकरी परंपरेचा गौरव करणारा हा ऐतिहासिक गोल रिंगण सोहळा जालनाकरांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत