लंडनमधील आंतरराष्ट्रीय ‘राजकीय विचारांचा इतिहास’ परिसंवादात प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा सहभाग ब्रिटिश लोकशाही, राजकीय विचारांचा इतिहास आणि संशोधनाच्या नव्या प्रवाहांचा घेतला सखोल अभ्यास
लंडनमधील आंतरराष्ट्रीय ‘राजकीय विचारांचा इतिहास’ परिसंवादात प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा सहभाग
ब्रिटिश लोकशाही, राजकीय विचारांचा इतिहास आणि संशोधनाच्या नव्या प्रवाहांचा घेतला सखोल अभ्यास
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी भालोद : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील मधुकर नेवे यांनी १ जुलै २०२६ रोजी इंग्लंडमधील लंडन येथे इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, सेनेट हाऊस, लंडन विद्यापीठ येथे आयोजित प्रतिष्ठित ‘राजकीय विचारांचा इतिहास’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभाग नोंदविला.
जगभरातील प्रख्यात प्राध्यापक, संशोधक, संशोधन विद्यार्थी आणि राजकीय विचारांचे अभ्यासक सहभागी झालेल्या या परिसंवादात लोकशाहीची उत्क्रांती, राज्यसंस्थेची संकल्पना, स्वातंत्र्य, समानता, न्याय, आधुनिक राजकीय सिद्धांत, उदारमतवाद, राष्ट्रवाद, संविधानवाद तसेच समकालीन जागतिक राजकारणातील बदल या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
परिसंवादादरम्यान प्रा. डॉ. नेवे यांनी विविध देशांतील विद्वानांशी संवाद साधून राजकीय विचारांच्या इतिहासाचा आधुनिक लोकशाही व्यवस्थेवर होणारा प्रभाव, संशोधनातील नवीन दिशा आणि राज्यशास्त्र विषयातील जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. भारतीय राज्यघटना, संसदीय लोकशाही आणि भारतीय राजकीय विचार जागतिक पटलावर अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी उपयुक्त अशा अनेक नवीन संकल्पना व संशोधन दृष्टिकोन समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.
यापूर्वीही प्रा. डॉ. नेवे यांनी अर्जेंटिना, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत संशोधन सादर केले असून, त्यांच्या संशोधन कार्याची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात दखल घेण्यात आली आहे. राज्यशास्त्र विषयातील जागतिक शैक्षणिक संवादात त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यात त्यांनी ब्रिटिश संसदेचे कनिष्ठ सभागृह, ब्रिटिश संसदेचे वरिष्ठ सभागृह, रॉयल न्यायालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, राष्ट्रीय चित्रदालन तसेच इतर ऐतिहासिक व शैक्षणिक संस्थांना भेट देऊन ब्रिटिश संसदीय लोकशाही, न्यायव्यवस्था, संशोधन संस्कृती आणि सार्वजनिक प्रशासनाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. या अनुभवांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्यापनात, संशोधनात आणि राज्यशास्त्र विषयाच्या गुणवत्तावृद्धीसाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. नेवे यांच्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशाबद्दल मा. आमदार अमोल जावळे, सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, भालोदचे अध्यक्ष श्री. गणेश नेहेते, उपाध्यक्ष श्री. गोपाळ चौधरी, सचिव श्री. भास्कर पिंपळे, चेअरमन सौ. हेमलता ताई इंगळे, उपचेअरमन श्री. नारायण बापू चौधरी, प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे, मुख्याध्यापक श्री. आर. एस. जावळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीलवंती बोरोले, संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. नेवे यांच्या या सहभागामुळे कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद तसेच उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठाशी जोडण्यास बळ मिळणार असून, विद्यार्थ्यांना जागतिक संशोधन संस्कृतीची ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत