डॉ. मिलिंद जोशी यांची 'सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी'च्या चेअरमनपदी निवड डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
डॉ. मिलिंद जोशी यांची 'सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी'च्या चेअरमनपदी निवड
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालशल्यचिकित्सा व बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख तथा बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांची इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स अंतर्गत कार्यरत 'सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी'च्या चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, जळगाव जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीही हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
'सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी' ही देशातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची अग्रगण्य संस्था मानली जाते. या संस्थेच्या चेअरमनपदी निवड होणे ही मोठी व्यावसायिक कामगिरी समजली जाते.
बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या डॉ. मिलिंद जोशी यांनी विशेषतः लहान मुलांमधील मुतखड्यांवरील दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपिक) शस्त्रक्रिया, जन्मजात मूत्ररोग विकारांवरील उपचार तसेच आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींच्या वापरात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी देशासह परदेशातही अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करून आपल्या कौशल्याची छाप पाडली आहे. संशोधन, अध्यापन आणि उत्कृष्ट रुग्णसेवेच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. जोशी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच उपचार, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि आधुनिक उपचारपद्धतींच्या प्रसाराला अधिक गती मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीचा लाभ देशभरातील बालरुग्णांना होणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.
या निवडीबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्यासह विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. मिलिंद जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत