Contact Banner

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे संयुक्त यश



 

40-year-old-woman-becomes-cancer-free-after-successful-ovarian-cancer-surgery-at-dr-ulhas-patil-hospital-jalgaon

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे संयुक्त यश

जळगाव | प्रतिनिधी : मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील ४० वर्षीय महिलेला अंडाशयाच्या (ओव्हेरियन) कॅन्सरवर वेळेत निदान व यशस्वी शस्त्रक्रिया करून नवजीवन देण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कॅन्सर आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे, ही अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून संबंधित महिलेला सतत पोटदुखी आणि पोट फुगण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला सामान्य आजार समजून उपचार घेतले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला.






रुग्णालयातील स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मृदुला मुंगसे आणि डॉ. प्राजक्ता पाटील यांनी सीटी स्कॅनसह आवश्यक तपासण्या केल्या. या तपासणीत महिलेला अंडाशयाचा कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णाची प्रकृती आणि आजाराची गंभीरता लक्षात घेऊन कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अतुल भारंबे यांना उपचारासाठी सहभागी करण्यात आले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त पथकाने सायटोरिडक्शन सर्जरी आणि डी-बल्किंग सर्जरी या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुमारे पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान अंडाशयाजवळील दोन मोठ्या कॅन्सरच्या गाठी यशस्वीरित्या काढण्यात आल्या. तसेच शरीरातील कॅन्सरग्रस्त ऊती शक्य तितक्या प्रमाणात काढून टाकण्यात आल्या.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्या पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. तेजस सोनवणे, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. ऋचा गौर, डॉ. चंदन महाजन, डॉ. प्रचिती पथरदे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शीतल फेगडे आणि इतर सहकारी डॉक्टरांनी मोलाचे योगदान दिले.


"ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य पोटदुखी, पोट फुगणे किंवा भूक कमी लागणे अशी असल्यामुळे महिलांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णाला चांगले आयुष्य मिळू शकते."
– डॉ. अतुल भारंबे, कॅन्सरतज्ज्ञ, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, जळगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.