अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानला भीषण आग; ४०० वर्षे जुना सागवानी सभामंडप खाक, देवमूर्ती सुरक्षित
अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानला भीषण आग; ४०० वर्षे जुना सागवानी सभामंडप खाक, देवमूर्ती सुरक्षित
लेवाजगत न्यूज अमळनेर :-
संपूर्ण महाराष्ट्रात प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये बुधवारी रात्री भीषण आग लागून सुमारे ४०० वर्षे जुना सागवानी लाकडी सभामंडप जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, सीसीटीव्ही यंत्रणेजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ती अल्पावधीत संपूर्ण लाकडी वास्तूमध्ये पसरली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
बुधवारी सकाळी ह.भ.प. प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची आषाढी पायी दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या बाजूस असलेल्या बैठक खोलीच्या परिसरात आग लागली. मंदिर पूर्णपणे लाकडी असल्याने आणि लाकडावर नियमित ऑइल पेंट करण्यात येत असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच अन्य ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या, खाजगी पाण्याचे टँकर आणि नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या घटनेदरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील यांनी बोरी नदीच्या दोन्ही काठांवर विकसित केलेल्या रस्त्यांचा मोठा फायदा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत घटनास्थळी पोहोचल्या; अन्यथा सराफ बाजारातील अरुंद रस्त्यांमधून मदतकार्य करणे अत्यंत कठीण झाले असते.
आगीची माहिती मिळाल्यानंतरही ह.भ.प. प्रसाद महाराजांनी पंढरपूरकडे निघालेली दिंडी थांबवली नाही. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, "आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सीसीटीव्ही बॉक्सजवळ आग लागल्याने ती भडकली. वारीसाठी निघाल्यानंतर परत फिरण्याचा प्रश्नच नाही. माझ्या आईच्या निधनाच्या वेळीही मी दिंडी सोडली नव्हती. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी."
घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदार अनिल पाटील यांनीही अतिरिक्त अग्निशमन बंब व पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.
मदतकार्यात विविध धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडवले. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलासोबत खांद्याला खांदा लावून मदतकार्य केले.
आगीत मोठे नुकसान झाले असले तरी देवमूर्ती सुरक्षित राहिल्या आहेत. मात्र, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच ग्राह्य धरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत