Contact Banner

जळगाव स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

 

जळगाव स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; मोठा अनर्थ टळला


जळगाव स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; मोठा अनर्थ टळला


लेवाजगत न्युज जळगाव :-


मुंबईहून अमृतसरकडे जाणारी गाडी क्रमांक 11057 अमृतसर एक्स्प्रेस बुधवारी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकात दाखल होत असताना तिच्या जनरेटर कारच्या बोगीखाली आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने आग वेळेत आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.





प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे रुळावरील लोखंडी 'की' (चावी) उडून ती डिस्ट्रिब्युशन व्हॉल्व्ह (डीव्ही)ला लागल्याने एअर प्रेशर अचानक कमी झाले. परिणामी ब्रेक जाम झाले आणि ब्रेक डिस्कमध्ये निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेमुळे आग लागल्याचे समोर आले आहे.


घटनेवेळी बोगीखाली मोठ्या क्षमतेचे डिझेल टँक असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आग त्या टँकपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.


आग लागल्याचे लक्षात येताच स्थानक प्रशासन, रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी तत्काळ अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आली. त्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करून सकाळी सुमारे ८.१५ वाजता गाडी पुढील प्रवासासाठी भुसावळच्या दिशेने रवाना करण्यात आली.


दरम्यान, भुसावळहून ड्युटी संपवून जळगावात आलेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव यांनी प्रसंगावधान राखत वरिष्ठांशी समन्वय साधला आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास महत्त्वाची मदत केली. त्यांच्या तत्परतेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.


रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची तांत्रिक चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.