Contact Banner

अमळनेरच्या तरुणीचा नाशिकमध्ये चाकूने भोसकून खून; हल्लेखोर पसार


ekatarfi-prematun-tarunicha-gala-chirun-nirghrun-khun-nashik






*वैष्णवीची हत्या करून प्रियकरानेही घेतला गळफास; नाशिकमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! >>https://www.lewajagat.com/2026/07/vaishnavichi-hatya-karun-priyakar-sahil-lavhare-yanehi-ghetla-galafas-nashik-indiranagar.html




एकतर्फी प्रेमातून अमळनेरच्या तरुणीचा नाशिकमध्ये गळा चिरून निर्घृण खून

उद्यान परिसरात रात्री १०.३०ची घटना; मैत्रिणीसोबत बसलेल्या वैष्णवीवर अचानक चाकूने हल्ला, संशयित प्रियकर फरार

प्रतिनिधी | नाशिक

एकतर्फी प्रेमप्रकरणातून अमळनेरच्या २० वर्षीय तरुणीचा नाशिकमध्ये भररस्त्यात गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळील दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास हा थरार घडला. वैष्णवी अनिल आवारे (२०) असे मृत तरुणीचे नाव आहे. खून केल्यानंतर संशयित तरुण दुचाकीवरून पसार झाला असून, इंदिरानगर पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी मूळची अमळनेर येथील रहिवासी असून, शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत होती. ती कानडे रो-हाऊसमध्ये पेइंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होती. शुक्रवारी रात्री ती वनसंपदा सोसायटीतील उद्यान परिसरात आपल्या मैत्रिणीसोबत बसली होती. याच वेळी संशयित तरुण तेथे आला. त्याने वैष्णवीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही.

यानंतर संशयित तेथून निघून जात असताना अचानक त्याने खिशातून चाकू काढला आणि वैष्णवीच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने वैष्णवीने बचावासाठी जोरजोरात आरडाओरड केली. मात्र, परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून येण्यापूर्वीच संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेली वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनास्थळी चाकू आढळला

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाची पाहणी केली असता गळ्यावर चाकूने वार केल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून हल्ल्यात वापरलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्यासह इंदिरानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून संशयिताचा शोध सुरू केला.

सायंकाळी झाली होती चर्चा

प्राथमिक माहितीनुसार, संशयित तरुण हा वैष्णवीचा मित्र असून, एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी दोघांमध्ये एका ठिकाणी चर्चा झाल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर रात्री संशयिताने वैष्णवीचा पाठलाग करून उद्यान परिसरात तिच्यावर हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वनसंपदा सोसायटीतील दत्त मंदिर परिसर रात्रीच्या वेळी तुलनेने शांत असतो. याच परिस्थितीचा फायदा घेत संशयिताने वैष्णवीवर अचानक हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वैष्णवीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या निर्घृण हत्येमुळे वनसंपदा सोसायटीसह संपूर्ण इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.