Contact Banner

वैष्णवीची हत्या करून प्रियकरानेही घेतला गळफास; नाशिकमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार!

vaishnavichi-hatya-karun-priyakar-sahil-lavhare-yanehi-ghetla-galafas-nashik-indiranagar


वैष्णवीची हत्या करून प्रियकरानेही घेतला गळफास; नाशिकमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार!

इंदिरानगरमध्ये अवघ्या काही मिनिटांत दोन मृत्यू; जुन्या प्रेमसंबंधातून खून केल्याचा प्राथमिक अंदाज

लेवाजगत प्रतिनिधी , नाशिक-

शुक्रवारी रात्री नाशिकच्या इंदिरानगर परिसरात जुन्या प्रेमसंबंधातून २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या प्रियकरानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी अनिल आवारे (२०) हिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्यानंतर मुख्य संशयित साहिल अशोक लाव्हारे याचा मृतदेह मध्यरात्री जॉगिंग ट्रॅकजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वनसंपदा सोसायटीतील उद्यान परिसरात शुक्रवारी रात्री वैष्णवी अनिल आवारे हिच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. वैष्णवी ही मूळची अमळनेर येथील रहिवासी असून, शिक्षणासाठी नाशिकमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होती.



*अमळनेरच्या तरुणीचा नाशिकमध्ये चाकूने भोसकून खून; हल्लेखोर पसार >>* 




मैत्रिणीसोबत बसलेली असताना हल्ला

शुक्रवारी रात्री वैष्णवी आपल्या मैत्रिणीसोबत उद्यान परिसरात बसली होती. त्यावेळी संशयित साहिल तेथे आला. त्याने वैष्णवीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद न दिल्याने तो तेथून निघून जात असताना अचानक त्याने खिशातून चाकू काढून वैष्णवीच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात वैष्णवी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर साहिल घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्ल्यात वापरलेला चाकूही ताब्यात घेतला आहे.

काही वेळातच संशयिताचाही मृतदेह

वैष्णवीच्या हत्येनंतर मुख्य संशयित साहिलचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच मध्यरात्री इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता साहिल मृतावस्थेत आढळला.

वैष्णवीची हत्या आणि त्यानंतर साहिलची आत्महत्या या दोन्ही घटनांमुळे इंदिरानगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या रक्तरंजित थरारामागील नेमके कारण काय, याचा तपास इंदिरानगर पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनास्थळी इंदिरानगर पोलिसांसह गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले होते. दोन्ही घटनांचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.