अमळनेरला शोककळा! सेल्फीचा मोह जीवावर; मित्राला वाचवताना तिघा विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू
अमळनेरला शोककळा! सेल्फीचा मोह जीवावर; मित्राला वाचवताना तिघा विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू
अमळनेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
अमळनेर शहरावर मंगळवारी सायंकाळी मोठी शोककळा पसरली. सेल्फी काढण्याच्या मोहात एका विद्यार्थ्याचा पाय घसरल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या दोघा मित्रांसह तिघांचाही खदानीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता चोपडा रोडवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खदानीत हा दुर्दैवी प्रकार घडला. मृतांमध्ये मानव बंटी रत्नानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) यांचा समावेश आहे. यापैकी मानव आणि कार्तिक हे नववीचे, तर दिनेश हा अकरावीचा विद्यार्थी होता.
शाळा सुटल्यानंतर फिरायला गेले, अनर्थ ओढवला
मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र शाळा सुटल्यानंतर चोपडा रोडवरील खदानी परिसरात फिरण्यासाठी गेले होते. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे खदान पूर्णपणे पाण्याने भरली होती. निसर्गरम्य दृश्य पाहून त्यांनी खडकावर उभे राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी एका विद्यार्थ्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी उर्वरित दोघांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
शहरात शोककळा
घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच वेळी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
ही घटना पुन्हा एकदा पावसाळ्यात धोकादायक जलाशय, खदानी आणि खोल पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे किंवा निष्काळजीपणे जाणे किती जीवघेणे ठरू शकते, याची गंभीर जाणीव करून देणारी ठरली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत