अमरावती जिल्ह्यातील युवकांचा उपक्रम: पंढरपूर येथे १०० किलो उपवासाच्या फराळाचे वाटप; हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ
अमरावती जिल्ह्यातील युवकांचा उपक्रम: पंढरपूर येथे १०० किलो उपवासाच्या फराळाचे वाटप; हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ
लेवाजगत न्यूज पंढरपूर:
'मानव सेवा हीच ईश्वर सेवा' या संत महात्म्यांच्या विचारांचा वारसा जपत, अमरावती जिल्ह्यातील युवकांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम पार पाडला. महाराष्ट्रासह देशभराच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी कोसो मैल पायदळ चालत आलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुमारे १०० किलोहून अधिक उपवासाच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
विठ्ठल मंदिराच्या मार्गावरील वृंदावन कॉलनी येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या उपवासाचे औचित्य साधून आयोजित या अन्नदानात साबुदाणा खिचडी, थंडगार मठ्ठा, आलू चिप्स, केळी, शेंगदाणा व खजूर लाडू, आणि फराळी चिवडा अशा विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता. मंदिराकडे जाणाऱ्या-येणाऱ्या अनेक दिंड्यांमधील हजारो वारकऱ्यांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
या सामाजिक कार्याची सुरुवात अमरावतीचे रहिवासी अनुप उर्फ बाळासाहेब झाडे यांनी केली असून, हळूहळू या उपक्रमात अमरावती जिल्ह्यातील अनेक उत्साही तरुण सहभागी झाले आहेत. या उपक्रमात मुकुंद वानखडे व त्यांचे वडील श्रीधरराव वानखडे, घनश्याम चुने, हरीभाऊ खत्री, वरुड तालुक्यातील काटी येथील मयूर घाटोळे, अंजनगाव सुर्जी येथील कवी अमित भांडे व त्यांचे वडील राजेंद्र भांडे तसेच पंढरपूर येथील स्थानिक रहिवासी श्रीमती नर्मदा राऊत यांनी विशेष सहभाग नोंदवला.
‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात या सर्व तरुणांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांनी समाजात मानवतेचा आणि सेवेचा एक सुंदर संदेश दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत