Contact Banner

भडगावमध्ये दारूसाठी पत्नीची हत्या; आरोपी पती अटकेत

 



भडगावमध्ये दारूसाठी पत्नीची हत्या; आरोपी पती अटकेत

लेवाजगत न्यूज | भडगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी (२६ जुलै) सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर धारदार चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मृत महिलेचे नाव ललिता आत्माराम राठोड (वय ३६) असे असून आरोपी पतीचे नाव आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०, रा. वसंतवाडी तांडा, ता. भडगाव) असे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात आरोपीने घरातील धारदार चाकूने पत्नीच्या पोटावर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने ललिता राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.




घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी मृत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्माराम राठोड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करीत आहेत.

या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच कौटुंबिक वादातून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.