भुसावळात भक्तीचा जयघोष; इस्कॉनतर्फे श्रीजगन्नाथ रथयात्रा उत्साहात
भुसावळात भक्तीचा जयघोष; इस्कॉनतर्फे श्रीजगन्नाथ रथयात्रा उत्साहात
भुसावळ : इस्कॉन भुसावळतर्फे आयोजित श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सव आज सायंकाळी ४ ते ८ या वेळेत अत्यंत भक्तिमय, भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आषाढ शुक्ल द्वितीया ते एकादशी या पवित्र कालावधीत होणाऱ्या या महोत्सवानिमित्त भुसावळ शहराला दरवर्षी भगवान श्रीजगन्नाथांच्या दिव्य रथयात्रेचे दर्शन घडते. यंदाच्या रथयात्रेत सुमारे ६०० भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
सायंकाळी ४ वाजता कमल गणपती हॉल येथून महाआरतीने रथयात्रेला प्रारंभ झाला. श्रीजगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा मातेच्या सुंदर विग्रहांची इस्कॉनच्या युवक-युवतींनी आकर्षक पुष्पसजावट व भव्य शृंगार केला होता. त्यामुळे रथाला अलौकिक स्वरूप प्राप्त झाले होते.
शंखनाद, मंगलध्वनी आणि महाआरतीच्या भक्तिमय वातावरणात रथयात्रेला सुरुवात झाली. मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवान श्रीजगन्नाथांच्या रथासमोर भाविकांनी सजविलेल्या झाडूंनी केलेली ‘छेरा पहरा’ सेवा विशेष आकर्षण ठरली.
या रथयात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या डीजे किंवा पूर्वरेकॉर्ड गाण्यांऐवजी भाविकांनी स्वतःच्या स्वरात ‘हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ॥’ या महामंत्राचे अखंड संकीर्तन केले. त्यामुळे संपूर्ण रथमार्ग भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
बालरूपातील दैवी झांक्यांनी वेधले लक्ष
रथयात्रेत लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत श्रीहनुमान, प्रभू श्रीराम, श्रीचैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, श्रीअद्वैत, गदाधर, श्रीवास, श्रीकृष्ण, बलराम, शिवजी, राधाराणी आणि नारदमुनी यांसारख्या दैवी रूपांचे सादरीकरण केले. या आकर्षक झांक्यांनी उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
रथयात्रेदरम्यान विविध ठिकाणी भाविकांसाठी थंड पेये, दूध, सरबत, केळी, खिचडी प्रसाद, वडा-पाव आणि मालपुआचे वितरण करण्यात आले. साई जॉन सुपर शॉप, पंचमुखी हनुमान परिसर, जळगाव रोड, बोयवाडा आदी ठिकाणी सेवाभावी भाविकांनी प्रसादाचे आयोजन केले. रथमार्गावर भगवान श्रीजगन्नाथांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करण्यात आली.
‘जगाचा नाथ’ म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीजगन्नाथ हे सर्व जीवांवर समान दृष्टी ठेवतात. मंदिरात येऊ न शकणाऱ्या प्रत्येक जीवाला कृपा मिळावी, यासाठी भगवान स्वतः रथावरून रस्त्यावर येतात, असा या रथयात्रेचा आध्यात्मिक संदेश आहे. संकीर्तन हे कलियुगातील सर्वोत्तम पूजा असल्याचा संदेशही या उत्सवातून देण्यात आला.
रथयात्रेचा समारोप रात्री ८ वाजता रामानंद हॉल येथे महाआरतीने झाला. समारोपावेळी अनेक भाविक श्रीजगन्नाथांच्या विरहभावनेने भावुक झाले. इस्कॉन भुसावळचे अध्यक्ष श्री मंत्रसत्र प्रभुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तांनी रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
भुसावळातील श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता भक्ती, समता, सेवा, एकता आणि भगवानाच्या कृपेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणारा दिव्य उत्सव ठरला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत