Contact Banner

भुसावळ हादरले! रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; चार दिवसांत दुसरा खून

 


भुसावळ हादरले! रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; चार दिवसांत दुसरा खून

लेवाजगत न्युज भुसावळ : शहरात अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दुसरी खुनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरपीडी रोड परिसरातील कालिका मंदिराच्या सेवेकऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच कवाडे नगर परिसरातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यात प्रहार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली.






प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८, रा. स्टार लॉन परिसर, भारंबे नगर, भुसावळ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद कुलकर्णी हे शनिवारी सायंकाळी रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये कर्तव्यावर होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित आकाश गोरखा तेथे आला. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संशयिताने तेथे पडलेली लोखंडी पट्टी उचलून कुलकर्णी यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.

डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रसाद कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून, फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, अवघ्या चार दिवसांत शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे परिसरातील निर्जन भाग, भंगार चोरी तसेच बेकायदा भंगार खरेदी-विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे परिसरात नियमित गस्त वाढवून भंगार चोरी आणि बेकायदा खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.