Contact Banner

पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

 

parvatibai-genba-moze-engineering-college-successfully-hosts-iceaemp-2026-international-conference


पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

वाघोली (प्रतिनिधी): पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय, वाघोली येथे दि. २४ व २५ जून २०२६ रोजी "इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग अॅडव्हान्सेस इन इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड फार्मसी (आयसीईएईएमपी-२०२६)" या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.






या परिषदेस देशभरातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्था तसेच औद्योगिक क्षेत्रातील संशोधकांकडून १५० हून अधिक संशोधन निबंध प्राप्त झाले. तज्ज्ञ समितीच्या सखोल परीक्षणानंतर निवडक संशोधन निबंध स्कोपस तसेच एससीआय सूचीबद्ध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडण्यात आले. या परिषदेमुळे संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संशोधनातील नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची, तज्ज्ञांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची तसेच जागतिक दर्जाच्या संशोधनाची माहिती मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.

परिषदेचे उद्घाटन डॉ. जितेंद्र होले (पश्चिम महाराष्ट्र प्रांत टोली सदस्य, भारतीय शिक्षण मंडळ, माजी अध्यक्ष – पुणे महानगर, भारतीय शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे येथील संशोधन व विकास अधिष्ठाता), डॉ. सोमनाथ कोलगिरी (प्रभारी प्राचार्य), डॉ. तुषार शेळके (प्राचार्य, फार्मसी महाविद्यालय) आणि डॉ. रितेश सुधाकर फेगडे (संशोधन व विकास अधिष्ठाता) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याशिवाय डॉ. प्रमोद पाटील (प्राचार्य, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NMIET), तळेगाव दाभाडे, महाराष्ट्र) यांनी ऑनलाइन माध्यमातून संशोधकांना मार्गदर्शन करून संशोधनातील गुणवत्ता, नावीन्य आणि उद्योगाभिमुख संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

परिषदेत थायलंडमधील पायप विद्यापीठाच्या इंटरनॅशनल कॉलेजचे डॉ. वानुस श्रीमहाराज यांनी आंतरराष्ट्रीय प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. तसेच डॉ. निखिल बरैया (एसव्हीएनआयटी, सुरत), डॉ. बालाजी आर. (लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब) आणि डॉ. रुपेंद्र शरद नेहेते (एसआयईएस, नेरूळ, मुंबई विद्यापीठ) यांनी राष्ट्रीय प्रमुख वक्ते म्हणून विविध समकालीन विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या मार्गदर्शनाचा संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.

परिषदेत स्मार्ट मटेरियल्स, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, औषधनिर्माणातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्योजकता, स्टार्टअप्स आणि शाश्वत विकास या विषयांवरील संशोधन निबंध सादर करण्यात आले. सहभागी संशोधकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व मोलाचा अभिप्राय मिळाला.

परिषदेचे संपूर्ण नियोजन व समन्वय डॉ. रितेश सुधाकर फेगडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडले. तसेच प्रा. हर्षदा शेळके आणि डॉ. सैफुल हक यांनीही परिषदेच्या नियोजन, समन्वय व यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर मोझे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, आयोजन समितीचे सदस्य, तांत्रिक समित्या तसेच विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग-शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याला चालना देणारी आयसीईएईएमपी-२०२६ परिषद महाविद्यालयाच्या संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, या परिषदेमुळे संस्थेच्या संशोधनपर उपक्रमांना नवी दिशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.