अक्कादेवी वाडीच्या रस्त्यावर कोसळलेली दरड युद्धपातळीवर हटवली; ग्रामपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई
अक्कादेवी वाडीच्या रस्त्यावर कोसळलेली दरड युद्धपातळीवर हटवली; ग्रामपंचायत प्रशासनाची तातडीची कारवाई
उरण | प्रतिनिधी
उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिरनेर परिसरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिरनेर येथील अक्कादेवी आदिवासी वाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने यंत्रणा हलवून युद्धपातळीवर दरड हटवून मार्ग पुन्हा सुरक्षित केला.
सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड व मुरूम साचल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि आदिवासी बांधवांचा संपर्क तुटला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता साफ करण्याचे काम त्वरित सुरू केले. संपूर्ण मलबा हटविल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
या कामावेळी सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच दीपक कातकरी, माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेत होते.
दरम्यान, सततच्या पावसाचा फटका उरण तालुक्यातील १७ गावांना बसला आहे. तब्बल १,०६९ घरांमध्ये पाणी शिरले असून १५ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. तसेच पाले व नागाव येथे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून दोन जिल्हा परिषद शाळांनाही नुकसान झाले आहे.
पाले गावातील हनुमान मंदिराजवळील शेकडो वर्षे जुना वटवृक्ष वादळी वाऱ्यामुळे मुळासकट कोसळला. या घटनेत मंदिराच्या शेडचे तसेच घनश्याम नामदेव म्हात्रे यांच्या घराचे नुकसान झाले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर सिडको अग्निशमन दलाने ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटवून परिसर सुरक्षित केला. तसेच संबंधित महसूल आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
चिरनेर, उरण, अक्कादेवी वाडी, दरड कोसळली, ग्रामपंचायत, रायगड, मुसळधार पाऊस, पूरस्थिती, JCB, उरण बातम्या, Raigad News, Landslide, Heavy Rain, Maharashtra News




कोणत्याही टिप्पण्या नाहीत