हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची उल्लेखनीय कामगिरी
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची उल्लेखनीय कामगिरी
लेवाजगत न्यूज जळगाव : हृदयविकाराने त्रस्त तसेच यापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेल्या २४ वर्षीय गर्भवती महिलेची अत्यंत जोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या केली. तज्ज्ञ डॉक्टरांचा समन्वय, अचूक नियोजन आणि वेळेवर केलेल्या उपचारांमुळे आई व बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले.
कल्पना (बदललेले नाव) या २४ वर्षीय महिलेवर यापूर्वी गंभीर हृदयविकारामुळे हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. अशा परिस्थितीत गर्भधारणा झाल्याने संपूर्ण गर्भावस्था अत्यंत जोखमीची मानली जात होती. दरम्यान, हृदयाचा त्रास, पाठीचे दुखणे आणि पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी महिलेची तपासणी केली. मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. पूर्वी झालेली हृदयाची शस्त्रक्रिया आणि सध्याची प्रकृती लक्षात घेता प्रसूतीदरम्यान आईच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात घेऊन मेडिसीन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी तसेच भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश यांच्या टीमने प्रसूतीची सविस्तर योजना आखली. आई आणि गर्भाच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. आवश्यक सर्व तपासण्या पूर्ण करून स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मेडिसीन विभाग आणि प्रशिक्षित परिचारिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्यंत काळजीपूर्वक प्रसूती करण्यात आली.
अखेर ही अत्यंत जोखमीची प्रसूती यशस्वी ठरली. आईसह बाळाची प्रकृती स्थिर असून दोघांवरही आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर, परिचारिका आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी दाखविलेली तत्परता, अचूक निर्णयक्षमता आणि तज्ज्ञ उपचारांमुळे आई व बाळाला नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कोट :
“हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूती ही नेहमीच उच्च जोखमीची असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपचारांमुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असून आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.”
— डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय




कोणत्याही टिप्पण्या नाहीत